
पुणे शहरात कात्रज येथे एका व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. उत्तरीय तपासणीमध्ये या व्यक्तीच्या मेंदूवर मार लागल्याच्या खुणा आढळल्या तसेच त्याचा मृत्यू गळफास दिल्यामुळे झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणात पोलिस तपास सुरू असतानाच हा खून त्या व्यक्तीची पत्नी आणि तिच्या अल्पवयीन मुलाने मिळून केल्याचे समोर आले आहे त्यानंतर त्यांनी या व्यक्तीचा मृतदेह लोखंडी पाइपला लटकवला आणि त्यांनी आत्महत्या केली असा बनाव रचला होता.
पोलिसांनी घटनेचा तपास केला असताना मयत व्यक्ती हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेत होता त्यामुळे संतप्त झालेल्या पत्नीने आपल्या अल्पवयीन मुलाला हाताशी घेत नवऱ्याचा काटा काढला. महिलेचा मुलगा हा 17 वर्षांचा अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आलेले आहे. प्रकाश किसन जाधव ( वय 42 ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर शालन जाधव ( वय 37) असे आरोपी पत्नीचे नाव असल्याचे समजते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज येथील लक्ष्मीमाता मंदिराजवळ शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास प्रकाश जाधव यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यांचा गळा दाबून तसेच डोक्यावर मारहाण करून हा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलिस तपास सुरू असतानाच जाधव यांच्या पत्नीने अल्पवयीन मुलाच्या मदतीने हा प्रकार केला अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे. विक्रमी वेळेत पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवलेले असल्याने परिसरात पोलिसांचे कौतुक केले जात आहे.