अजित पवार यांचा पुतळा जाळणे पडले महागात , ‘ त्या ‘ युवकाला बेड्या

शेअर करा

महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत असलेले अजित पवार यांचा पुतळा जाळणे एका तरुणाला चांगलेच महागात पडलेले असून सोलापूर इथे सदर बाजार पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुणे येथे एका मागासवर्गीय तरुणाचा खून करण्यात आला होता त्याच्या निषेधार्थ सोलापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले होते.

उपलब्ध माहितीनुसार पृथ्वीराज बाळासाहेब मोरे ( वय 23 राहणार जय मल्हार चौक बुधवार पेठ) असे गुन्हे दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. सदर प्रकार समजताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हा पुतळा विझवला.

पुतळा विझवल्यानंतर देखील पृथ्वीराज मोरे हा अजित पवार यांच्या विरोधात घोषणा देत होता त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पृथ्वीराज मोरे याने म्हटले आहे की, ‘ पुणे येथे प्रदीप कांबळे नावाच्या एका मागासवर्गीय तरुणाचा प्रेमप्रकरणाच्या संशयातून खून करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात मागासवर्गीय व्यक्तींवर अन्याय आणि अत्याचार वाढले आहेत म्हणून आपण हे आंदोलन केले ‘, असे त्याचे म्हणणे आहे.


शेअर करा