
देशात एक खळबळजनक अशी घटना समोर आली असून झारखंडमध्ये एका 21 दिवसांच्या मुलीच्या पोटातुन तब्बल आठ भ्रूण काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. यापूर्वी देखील लहान मुलांच्या पोटात भ्रूण आढळून आलेले आहेत मात्र एकाच वेळी आठ भ्रूण आढळण्याची ही जगातील पहिली घटना आहे असे डॉक्टरांनी म्हटले आहे. रांची येथील राणी बाल रुग्णालयातील हे प्रकरण आहे.
उपलब्ध माहितीनुसार, रामगडमधील एका सरकारी रुग्णालयात 10 ऑक्टोबर रोजी या चिमुरडीचा जन्म झालेला होता. तिच्या पोटात गाठ असल्याने तिची लवकरात लवकर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला तिच्या आई-वडिलांना देण्यात आला त्यानंतर त्यांनी तिला राणी बाल रुग्णालयात दाखल केले त्यावेळी तिच्या पोटात तब्बल आठ भ्रूण असल्याचे आढळून आले. त्यांचा आकार साधारण 3 ते 5 सेंटिमीटर इतका होता.
एकाच वेळी आठ भ्रूण काढण्याची ही शस्त्रक्रिया दुर्मिळ असून सदर शस्त्रक्रिया यशस्वी झालेली आहे. अजून काही दिवस देखरेखीखाली ठेवल्यानंतर तिला घरी सोडण्यात येईल अशी माहिती डॉक्टर इमरान यांनी दिले असून अशा पद्धतीने जुळ्या भावंडांना आपल्या पोटात घेऊन जन्माला येणारे मूल जन्मतःच त्रस्त होते. त्याला पोटदुखी, लघवी बंद होणे, पोटावर सूज असे असा त्रास होतो असे डॉक्टरांकडून सांगण्यात आलेले आहे .