
नगर शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी ११ च्या दरम्यान घडला आहे .आगीच्या या दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली असून आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झालेला आहे. काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे तर काही रुग्ण भाजल्याचे देखील वृत्त आहे.
नाशिकमध्ये झालेल्या ऑक्सिजन गळतीच्या घटनेनंतर ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. दरम्यान रुग्णालयाच्या फायर ऑडिटमध्ये त्रुटी असल्याचा आरोप स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे तर हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जगताप यांनी केली आहे. आयसीयू विभागात ऑक्सिजनच्या लीकेजमुळे किरकोळ स्वरूपाची शॉर्टसर्किट आग मोठे स्वरूप अवघ्या काही मिनिटात धारण करते त्यामुळे हा प्रकार झाला असल्याची दाट शक्यता आहे .
शॉटसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून दुर्घटनेप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी करणार असून तसंच मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना तातडीने सरकारी मदत दिली जाणार आहे तसेच आगीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे देखील सांगितले आहे . शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत देणार असल्याची देखील घोषणा केली आहे .