आठ लाखांना पंचवीस लाखांचा फायदा पण.., महावितरणच्या अधिकाऱ्याची फसवणूक

शेअर करा

महाराष्ट्रात फसवणुकीच्या अनेक घटना याआधी देखील उघडकीला आलेल्या आहेत मात्र अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यात समोर आलेली असून शेअर मार्केटच्या सोने ट्रेडिंगमध्ये पैसे अडकवले तर जास्त नफा मिळण्याचे आमिष दाखवून महावितरणच्या एका अधिकार्‍याची फसवणूक करण्यात आलेली आहे. देवेंद्र मोतीराम सिडाम ( वय 33 राहणार भुसावळ ) यांना तब्बल आठ लाख 85 हजार रुपयांना ऑनलाइन पद्धतीने फसवण्यात आलेले आहे. सायबर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरण कार्यालयात सहाय्यक अभियंता असलेले देवेंद्र मोतीराम सिडाम यांना डिसेंबर 2021 फेब्रुवारी २०२२ दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या व्यक्तींनी मोबाईलवरून फोनवर संपर्क साधत गोल्ड बार्स यामध्ये ट्रेडिंग केल्यास तुम्हाला चांगला नफा मिळेल असे सांगितले आणि त्यावर विश्वास ठेवून देवेंद्र सिडाम यांनी आठ लाख 85 हजार रुपये गुंतवले. त्या गुंतवणुकीवर आतापर्यंत तुम्हाला 25 लाख रुपयांचा नफा झाला असे देखील व्यवहारावरून निदर्शनास आले आणि त्यातील तीन लाख रुपये त्यांनी काढण्याचा निर्णय घेतला असता त्यासाठी दोन लाख 32 हजार रुपये कर भरावा लागेल त्याशिवाय ही रक्कम काढता येणार नाही असे त्यांना सांगण्यात आले.

गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला वेळोवेळी नफा मिळत गेला. पंचवीस लाखांचा नफा कंपनीतील आपल्या खात्यावर देखील जमा झाला मात्र पैसे काढता येत नाही म्हटल्यानंतर यांना त्याचा फायदा काय ? असा प्रश्न त्यांना पडला. त्यामुळे आपली फसवणूक होत असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि शनिवारी रात्री त्यांनी सायबर पोलिसात तक्रार केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे हे करत आहे.


शेअर करा