
नगर जिल्ह्यातील राहुरी येथे याच महिन्यात पोलीस हवालदार भाऊसाहेब आघाव यांनी गोळी झाडून आत्महत्या केली होती. सदर प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार आहेत तर आघाव कुटुंबाला संपवण्याची धमकी देणारे पत्र आल्याचे त्यांच्या मुलाने सांगितलेले असून प्रेमकुमार आघाव यांनी यासंदर्भात माहिती दिलेली आहे. पोलीस दलातील वसुली कांड प्रकरण समोर आल्यानंतर भाऊसाहेब आघाव यांना विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकविण्यात आले आणि त्यानंतर त्यांना सहीसलामत बाहेर काढण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली होती त्यानंतर त्यांनी राहुरी येथे ड्युटीवर असताना स्वतःला गोळी मारुन आत्महत्या केली होती.
एक ऑक्टोबर रोजी ही घटना घडल्यानंतर पोलिस दलात देखील चांगलीच खळबळ उडाली होती. भाऊसाहेब आघाव यांचा दहा लाख रुपयांसाठी छळ करण्यात आला होता हे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलेले आहे. सदर चार जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे मात्र चारही आरोपी पोलिस दलाशी संबंधित असल्याने अद्यापही फरार आहेत. सदर आरोपी पोलिसांना अद्यापही हाती लागू नयेत की जाणीवपूर्वक त्यांना पकडण्याची कारवाई केली जात नाही यावर देखील नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत. पोलीस दलातील वसुली कांड बाहेर येईल म्हणून तर ते फरार नाहीत ना असा देखील प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.
सात तारखेला मयत भाऊसाहेब आघाव यांचा मुलगा असलेला प्रेमकुमार यांच्या नावे दोन निनावी पत्रे आली होती त्यामध्ये मयत भाऊसाहेब आघाव यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर लिहून नागापूर एमआयडीसी जिमखाना हॉल येथील एका व्यक्तीला दहा लाख रुपये देण्याचे सांगण्यात आले होते नाहीतर भाऊसाहेब याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात येईल आणि कुटुंबातील एका व्यक्तीला शिल्लक ठेवले जाणार नाही असे देखील त्यांना धमकावले असल्याचे म्हटले आहे. सदर प्रकरणातील सुसाईड नोटमध्ये लिहलेल्या व्यक्तींना ताब्यात घेतल्यास मोठ्या प्रमाणात वसुली तसेच गैरकृत्ये बाहेर येतील त्यामुळे या व्यक्तींची कुणाकडून पाठराखण सुरू आहे असे मात्र गुलदस्त्यात आहे.