
प्रेमविवाह केल्यानंतर नवीन दांपत्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो मात्र याच वेळी मोठ्या मानसिक दबावातून प्रियकराला दारूचे देखील व्यसन लागू शकते, अशीच एक घटना यवतमाळ जिल्ह्यात समोर आलेली असून प्रेमविवाह केल्यावर दारूच्या आहारी गेलेल्या पतीला सोडून पत्नी माहेरी निघून गेली आणि ती परत येत नव्हती म्हणून संतप्त झालेल्या जावयाने आपल्या वयोवृद्ध सासऱ्याचा डोक्यात दगड घालून खून केला. यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथे ही घटना उघडकीला आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार विश्राम बिसन वयले ( वय 55 राहणार टिटवा तालुका चांदुर रेल्वे ) असे मयत व्यक्तीचे नाव असून त्यांच्या मुलीने राजेश सुधाकर शिवणकर ( वय 29 ) याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. सुरुवातीचे काही दिवस चांगले राहिल्यानंतर राजेश त्याला दारूचे व्यसन लागले आणि तो पत्नीवर संशय घेऊन तिला मारहाण करु लागला त्यानंतर अखेर त्याची पत्नी वैतागून आपल्या वडिलांकडे राहायला आली मात्र तो तिला सोबत चल म्हणून सातत्याने तगादा करत असायचा मात्र त्याच्यावर भरवसा नसल्याने वडील तिला सासरी पाठवत नव्हते.
विश्राम हे बाभूळगाव तालुक्यातील पिंपळखुटा शिवारात काम करत असताना करण्यासाठी गेले ते पुन्हा आलेच नाही म्हणून त्यांचा मुलगा शंकर हा त्यांना शोधण्यासाठी शेतात गेलेला असताना विश्राम त्याला मयत अवस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार केलेला होता याची तक्रार शंकर याने बाभूळगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर प्रकरणी ठाणेदार रवींद्र जेधे यांनी कलम 302 गुन्हा दाखल करून आरोपी राजेश याला अटक केली आहे. विश्राम यांच्या रोजच्या दिनचर्येवर आरोपी हा पाळत ठेवून होता. त्यानंतर शेतात ते दिसल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करत आरोपीने त्यांचा खून केला असा त्याच्यावर आरोप आहे.