कष्टाळू युवकाच्या हातात मोबाईल आला अन 75 लाखाचे कर्ज डोक्यावर घेऊन बसला

शेअर करा

तरुण पिढीला ऑनलाइन जुगाराच्या नादात अडकवत त्यांना कंगाल करण्याचे प्रयत्न ऑनलाइन जुगार चालवणाऱ्या कंपन्यांकडून करण्यात येत आहे. दुर्दैवाने सरकारी पातळीवर देखील अशा कंपन्यांच्या विरोधात कुठलीच कारवाई होत नसल्याने तरुण पिढी बरबाद होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी येथे उघडकीस आली असून शेतकरी कुटुंबातील एका कष्टाळू युवकाला रौलेट खेळण्याचा नाद लागला. रौलेट खेळण्याच्या नादात त्याने सावकाराकडे उसनवारी केली मात्र त्याचे सावकाराचे पैसे पाडण्यात त्याला अपयश आले आणि त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, गोरख त्रिंबक गवळी असे या युवकाचे नाव असून नातेवाईकांनी तात्काळ त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. गवळी याने पोलिसांकडे या आधी देखील सावकारांकडून होत असलेल्या छळाबद्दल तक्रार दिली होती मात्र पोलिसांनी सावकार याला वाचवण्याचा प्रयत्न केला असादेखील कुटुंबियांचा आरोप आहे.

काही खाजगी सावकार गोरख याच्याकडे पैशासाठी दबाव वाढवत आहे. रौलेट जुगाराच्या नादात गोरखच्या डोक्यावर सुमारे 75 लाख रुपयांचे कर्ज झाले आहे त्यामुळे नैराश्याने त्याने हे कृत्य केल्याचे समोर येत आहे. ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी अशा युवकांना पैसे उपलब्ध करून देणाऱ्या सावकारांवर कठोर कारवाईची गरज असल्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

ग्रामीण युवकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी ऑनलाइन जुगार, क्रिकेट बेटिंग अशा स्वरूपाने त्यांना कंगाल केले जात आहे. ज्या ज्या ठिकाणी ग्रामीण पातळीवरील युवकांचा संपर्क येतो त्या ठिकाणी स्मार्ट फोनवर ॲप वितरण करून ऑनलाइन जुगार, क्रिकेट बेटिंग अशा बहाण्यांनी या युवकांना बोलवले जाते आणि त्यातून त्यांना पद्धतशीरपणे कंगाल करण्यासाठी सदर टोळकी ग्रामीण ठिकाणी कार्यरत आहेत. पान टपरी, कटिंग सलून, ढाबे, चहाचे ठेले चालवणाऱ्या व्यवसायिकांना कमिशनची भुरळ देत या युवकांना आपल्या जाळ्यात ओढले जाते. दुर्दैवाने पोलिसांकडून सदर प्रकरणी कठोर कारवाईची मागणी नागरिक करत आहेत.


शेअर करा