
महाराष्ट्रात एक वेगळीच घटना उघडकीस आली असून चक्क इलेक्ट्रॉनिक लायटर हे पिस्तूल आहे असे धमकावून त्याने चोरी केली मात्र त्याच्याकडील ही वस्तू लायटर असल्याचे चाणाक्ष गावकऱ्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी त्याला धो धो धुतले. भामट्याने स्वत: जवळील सिगारेट पेटवण्याचं लायटर बंदूक म्हणून गावकऱ्यांच्या दिशेनं रोखलं मात्र ते लायटर आहे हे ओळखल्याने गावकऱ्यांनी त्याला चांगलेच धुतले. कोल्हापूर जिल्ह्याच्या पेठवडगाव परिसरातील वाठार येथील 95 वर्षीय बनूबाई शामराव जगताप यांनी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, 95 वर्षीय बानूबाई शामराव जगताप या आपल्या घरासमोर बसल्या होत्या. यावेळी 19 वर्षीय आरोपी अविष्कार माळी त्याठिकाणी आला आणि पत्ता विचारण्याचा बहाणा करत बनूबाई जगताप यांच्या दिशेनं आला अन काही कळायच्या आत आरोपीनं जगताप यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे दागिने हिसकावले आणि धूम स्टाइलने फरार झाला मात्र तो ज्या दिशेने पळाला तिथे नेमका ओढा असल्याने त्याला पाठीमागे फिरावे लागले.
आता आपण अडकलो आहे ते लक्षात येताच आरोपीने माझ्याकडे बंदूक आहे. मला सोडा अन्यथा गोळ्या घालेल अशी धमकी दिली मात्र भामट्याच्या हातात बंदूक नसून ती सिगारेट पेटवण्याचं लायटर असल्याचं लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी आरोपीला बेदम चोप दिला. बानूबाई यांनी देखील त्याला चांगलेच वाजवले. शुक्रवारी रात्री उशिरा वडगाव पोलीसांनी आरोपीला अटक केली अन न्यायालयाने त्याला 2 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.