
गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी प्रत्येकवेळी वेगवेगळी शक्कल लढवत असतो अशीच एक घटना कोल्हापुर पाठोपाठ पुणे येथे देखील उघडकीला आली आहे. पुणे जिल्ह्यातील मंचरनजीक असलेल्या लांडेवाडी येथे पोलीस असल्याची बतावणी करत दोन दुचाकीस्वारांनी एका ज्येष्ठ नागरिकाची पंचेचाळीस हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी लुटून गायब केली आहे .
किसन महादू लांडे असे फसवल्या गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून सदर प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार लांडेवाडी येथील रहिवासी असलेले किसन लांडे ( वय 78) हे सकाळी देवदर्शन करून पेपर आणण्यासाठी गेलेले असताना मंचर- घोडेगाव रस्त्यावर लांडेवाडी गावाच्या हद्दीत दोन अनोळखी तरुणांनी त्यांना हाक मारून हटकले. आम्ही पोलिस आहोत तुम्ही मास्क का घातले नाही अशी विचारणा केली.
अंगठी घालून कुठे फिरता ? असे म्हणत हातातली अंगठी कागदात बांधत लांडे यांच्या हातातील पिशवीत तो कागद टाकण्याचा बहाणा केला मात्र अंगठीच्या कागदाची पुडी त्यांनी त्यात न टाकता दगड असलेली कागदाची पुडी टाकली आणि ते निघून गेले . घरी गेल्यानंतर लांडे यांना शंका आली म्हणून त्यांनी पिशवी पाहिली असता त्यात दगड असल्याचे आढळून आले. अशाच पद्धतीने कोल्हापूर येथे देखील दोन दिवसांपूर्वीच चोरी करण्यात आली होती. सदर प्रकारापासून नागरिकांनीदेखील सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांना पोलिसांकडून करण्यात आले आहे.