
अनेक दुचाकी गाड्यांना फॅन्सी नंबर प्लेट लावून त्यात दादा मामा काका शोधण्याचा प्रयत्न अनेक महाभाग करत असतात. अनेकदा गुन्हा घडल्यानंतर देखील नक्की नंबर काय हे शोधण्यासाठी पोलिसांना नाहक मेहनत करावी लागते. अनेकदा सांगून देखील अशा व्यक्तींमध्ये बदल होत नसल्याने लातूर शहरांमध्ये पोलीस दलाकडून एक कौतुकास्पद निर्णय घेण्यात आलेला असून शहरातील पेट्रोल पंप, चालक, ऑटोमोबाईल आधी दुकानांना नोटिसा बजावलेल्या आहेत . त्यात दादा मामा काका नाना तसेच नंबर नसलेल्या वाहनांना पेट्रोल डिझेल देऊ नका, असे देखील ठामपणे बजावण्यात आलेले आहे.
लातूर शहरासह अनेक ठिकाणी नियमबाह्य वेड्यावाकड्या पद्धतीने नंबर टाकून कायद्याचे उल्लंघन होत आहे. गुन्हा घडल्यानंतर सदर नंबर प्लेट देखील जर अशी असेल तर तो नंबर शोधण्यासाठी पोलिसांना निष्कारण आपला वेळ वाया घालावा लागतो त्यामुळे आता फॅन्सी नंबर प्लेट असलेली वाहने जर पेट्रोल पंपासाठी इंधनासाठी आली तर त्यांना इंधन देऊ नका, अशी नोटीस विविध पेट्रोलियम कंपन्यांच्या विभागीय व्यवस्थापकांना देण्यात आलेली आहे तसेच सर्व रिटेलरला देखील त्यांनी सूचना कराव्यात असे देखील या नोटिशीत म्हटले आहे.
वाहतूक नियमांची जनजागृती होऊन अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी दंडात्मक कारवाईचे फलर बॅनर लावावेत अशी सूचना करण्यात आलेली आहे तसेच सदर गाडीवर जर फटाका सायलेन्सर लावलेले असेल तरी देखील त्यांना इंधन देऊ नये, अशा सूचना वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी केल्या आहेत.
बुलेट गाड्यांच्या सायलेन्सरचा फटाका बंद करण्यासाठी थेट विक्रेत्यांना यापूर्वीदेखील पोलिसांनी नोटिसा बजावल्या होत्या आता पुन्हा एकदा या गाड्यांची सर्विसिंग आणि विक्री करणाऱ्या शोरूमच्या व्यवस्थापकांना नोटीस देण्यात आलेली आहे. त्यामध्ये मफलर सायलेन्सर, फॅन्सी नंबर प्लेट अशा वाहनांना सेवा देण्यात येऊ नये अशा सूचना वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी केलेल्या आहेत.