
देशात फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आलेले असताना देखील नागरिक देखील काळजी घेत नाहीत अशीच एक घटना समोर आली आहे. नवी मुंबई येथील एका महिलेला युकेमधून अज्ञात व्यक्तीने गिफ्ट पाठवले असे सांगत तब्बल 46 लाखांना चुना लावला आहे. नेरूळ पोलीस ठाण्यात या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सानपाडा सेक्टर 14 येथे राहणाऱ्या 48 वर्षीय महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांना युकेवरील नंबर वरून व्हाट्सअप वर एक मेसेज आला होता. त्यांनी त्या मेसेजला प्रतिसाद दिला आणि दोघांमध्ये दहा ते पंधरा दिवस सातत्याने संभाषण सुरू होते. सदर व्यक्तीने त्याचे नाव गारलेन असे सांगत आपण डॉक्टर आहोत असे सांगितले आणि महिलेला त्यांच्या जन्मदिवशी आपण एक महागडे गिफ्ट पाठवत आहोत असे त्याने सांगितले.
त्यानंतर काही दिवसांनी दिल्ली येथील कस्टम विभागातून आपण बोलत आहोत असे म्हणणाऱ्या एका महिलेचा फोन आला आणि पाठवलेले महागडे गिफ्ट तुम्हाला हवे असेल तर त्यासाठी कस्टम ड्युटी भरावी लागेल असे सांगत तब्बल 46 लाख रुपये वेळोवेळी या महिलेकडून भरून घेण्यात आले मात्र कोणतेही गिफ्ट आले नाही हे समजल्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली आणि त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.