
गुरुजी म्हटल्यानंतर मनामध्ये एक शांत आणि मनमिळाऊ प्रतिमा समोर येते मात्र या संकल्पनेला छेद देणारी घटना नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील नगरसुल येथे उघडकीस आली असून न्यू इंग्लिश स्कूल येथील मुख्याध्यापकाने आपल्याच शाळेतील शिक्षकाच्या हाताच्या अंगठ्याला चावा घेऊन रक्तबंबाळ केल्याची घटना समोर आलेली आहे. सदर प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून या प्रकाराची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
उपलब्ध माहितीनुसार मुख्याध्यापक सुरेश एस अहिरे यांच्यासह राजगुरू हे उपशिक्षक शाळेत कार्यरत आहेत. दिनांक 12 जानेवारी रोजी अहिरे यांनी सहकारी शिक्षक राजगुरू यांना तहसील कार्यालयासमोर बोलावून घेतले. त्यावेळी पैशाचा वाद होऊन अहिरे यांनी मद्याच्या नशेत कॅटलॉगची मागणी केली तसेच जेवणाचा देखील आग्रह धरला.
राजगुरू यांनी त्यांच्या या मागणीला दाद न दिल्याने अहिरे यांनी राजगुरू यांच्या डाव्या हाताच्या अंगठा तोंडात धरून जोरात चावा घेतला त्यामुळे अंगठ्याला मोठी जखम होऊन रक्त वाहू लागले. राजगुरू यांनी कसेबसे करत आपली सुटका करून घेतली आणि तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली.
राजगुरू यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुख्याध्यापक सुरेश अहिरे यांनी उपशिक्षक ब्रह्मचैतन्य जालिंदर राजगुरू यांच्या पगारातून खावटीसाठी दहा हजार रुपये कपात केली होती, मात्र कोर्टाने खावटी बंद केली म्हणून पैसे परत मागितल्याचा राग अहिरे यांना आला आणि त्यातून हा प्रकार घडला असे म्हटले आहे.