
देव तारी त्याला कोण मारी हे म्हणतात ते काही खोटे नाही अशीच एक घटना कसारा इथे समोर आलेली असून कसारा येथे एका तरुणाने शनिवारी संध्याकाळी घाटातील चारशे फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र तरीदेखील तो आश्चर्यकारक पद्धतीने बचावला आहे. आपत्ती व्यवस्थापन टीम, इगतपुरी पोलिस आणि स्थानिकांनी त्याला तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर दरीतून बाहेर जखमी अवस्थेत काढले.
जगदीश नाना पाटील ( वय 27 ) असे या तरुणाचे नाव असून घाटनदेवी मंदिराजवळ असलेल्या उंट दरीजवळ तो फोटो काढण्याच्या बहाण्याने गेला होता त्यानंतर अचानकपणे त्याने तिथे दरीत उडी घेतली. एका रिक्षाचालकाने ही घटना पाहिली आणि तात्काळ इगतपुरी पोलिसांशी संपर्क साधून त्यांना या प्रकाराची माहिती दिली. इगतपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक हॉटेल व्यावसायिक महेश शिरोळे यांना सोबत घेऊन खोल दरीत उतरून पाहणी केली तेव्हा हा तरूण जिवंत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यानंतर त्यांनी व्यवस्थापन टीमला बोलावले आणि तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर रात्री साडेआठ वाजता त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल केले असून त्याला जास्त मार लागला असल्यामुळे त्यानंतर त्याला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेले आहे.