
महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून बीड येथे ऑटोमोबाइल्सचे दुकान फोडून सुमारे सहा लाख रुपयांचे साहित्य लंपास केल्याची घटना बीड शहरात रविवारी पहाटे घडली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या चोवीस तासाच्या आत या टोळीचा पर्दाफाश करत तीन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींमध्ये बीडमधील एक तरुण औरंगाबाद येथे खाजगी कंपनीत कामाला आहे मात्र चोरी करण्यासाठी तो रजा टाकून बीडला आला आणि मित्रांच्या मदतीने त्याने चोरी केली असे देखील समोर आले आहे.
सोमनाथ रतन लोहकरे ( वय 32 राहणार हनुमान नगर एमआयडीसी वाळूज औरंगाबाद ) कबीर कुरण पठाण ( वय 32 राहणार श्रीपाद धामणगाव जिल्हा जालना), गणेश भारत गिरी ( वय 31 राहणार विश्वेश्वर नगर बीड ) अशी आरोपींची नावे आहेत तर टेम्पो चालक आणि एक जण पसार झाले आहेत.
महादेव बापूराव मोरे राहणार ( शिवाजीनगर बीड ) यांचे शहरातील जालना रोडवर ऑटोमोबाईल्सचे दुकान आहे. पहाटे चोरट्यांनी त्यांच्या दुकानातून चार चाकी व ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट असा एकूण सहा लाखांचा मुद्देमाल लांबवला त्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.
पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली असता सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी सोमनाथ लोहकरे व कबीर पठाण यांना त्यांच्या राहत्या औरंगाबाद येथील घरातून उचलले तर बीडमधून गणेश गिरी यालादेखील बेड्या ठोकण्यात आल्या. या तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी त्यांना देण्यात आलेली आहे.