
नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना शेवगाव तालुक्यात उघडकीला आलेली असून ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या खासगी जागेची मोजणी सुरू असताना ही मोजणी होऊच नये म्हणून एक जणांने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शरद शामू साबळे ( वय 40 राहणार ढोरजळगाव तालुका शेवगाव ) असे संबंधित व्यक्तीचे नाव असून त्यानंतर त्याला नगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सदर प्रकरणी, अरुण दौलत साबळे ( वय 58 राहणार ढोरजळगाव तालुका शेवगाव ) यांनी फिर्याद दिली असून त्यामध्ये ग्रामपंचायत हद्दीत मिळकत नंबर 391 मध्ये रिकामी मालकीची जागा आहे या जागेवर घराचे बांधकाम करण्यासाठी व त्याच्या मोजणीसाठी ग्रामपंचायतीकडे रीतसर अर्ज दाखल केला होता .
ग्रामसेवकांच्या मागणीवरून पोलीस संरक्षणाची फी भरून बंदोबस्ताची देखील मागणी करण्यात आलेली होती. सदर जागेची मोजणी बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सुरू असताना शेजारी राहणाऱ्या शरद साबळे यांनी मोजणी होऊ नये म्हणून विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. अरुण साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शरद साबळे यांच्या विरोधात आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल हे करत आहेत .