
महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे उघडकीला आली असून एका 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता मात्र मयत व्यक्तीच्या डोक्यावर मारहाणीच्या खुना आढळून आल्यावर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला मात्र जे चित्र समोर आले ते पाहून पोलिसही हादरून गेले. मयत व्यक्तीचा खून त्याच्या पत्नीच्या प्रियकराने केल्याचा पोलिसांचा अंदाज असून सदर महिलेचा प्रियकर हा तिच्यापेक्षा तब्बल दहा वर्षांनी लहान आहे.
उपलब्ध माहितीनुसार , कैलास अश्रुबा इंगोले ( वय ३८ ) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते लोणार तालुक्यातील सारस्वत येथील रहिवासी होते. मृत इंगोले यांची 30 वर्षीय पत्नी हिचे 20 वर्षीय आरोपी श्याम काशीराम दुधमोगरे ( वय २० ) याच्यासोबत अनैतिक प्रेमसंबंध सुरू होते मात्र मृत कैलास हा अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता म्हणून आरोपी श्यामने कैलास यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.
5 मार्च रोजी मृत कैलास इंगोले यांचा एका शेतात मृतदेह आढळला होता. लोणार पोलिसांनी सुरुवातीला अकस्मिक मृत्यूची नोंद केली मात्र मयताच्या डोक्यावर मारहाणीचे काही व्रण आढळून आल्याने त्यांची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना आला. स्थानिक सूत्रांच्या माध्यमातून पोलिसांनी अधिक तपास केला असता मृत कैलास यांच्या पत्नीचं गावातील एका 20 वर्षीय तरुणासोबत अनैतिक प्रेमसंबंध सुरू असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी संशयित आरोपी प्रियकर श्यामला अटक केली असून पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आरोपीनं मयताच्या पत्नीसोबत आपले प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली आहे. त्यानं हत्या केली की नाही? याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली असून गुन्ह्याचा पुढील तपास लोणार पोलीस करत आहेत.