
काही वर्षांपूर्वी गोविंदाचा ‘सॅन्डविच ‘ नावाचा एक चित्रपट आला होता त्यात चित्रपटाचा नायक हा एकाच शहरात दोन बायकांसोबत लग्न करून राहत असतो आणि त्यांना सांभाळताना त्याची चांगलीच कसरत होत असते . अशीच एक घटना हरियाणातील सोनीपत इथे उघडकीस आली असून पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न घेता एकाच शहरात दोन बायका सांभाळणाऱ्या एक व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . पहिल्या पत्नीनं त्याला रंगेहाथ पकडल्यानंतर आता आरोपी पती तिला जीवे मारण्याची धमकी देत असून पीडित महिलेने पोलिसात धाव घेतली आहे .
उपलब्ध माहितीनुसार, पीडित पहिली पत्नी ही मुरथळ येथील एका सोसायटीत राहत असून 2004 मध्ये रवींद्र मान याच्याशी लग्न केलं होतं. लग्नानंतर त्यांना आठ वर्षांची मुलगी आहे. बरेच दिवस दोघंही मुलीसोबत सुखाने राहत होते. मात्र काही दिवसांपासून रवींद्र याने पत्नीला वेळ देणे कमी केल्याने पत्नीचा त्याच्यावर संशय बळावला आणि तिने त्याचा पाठलाग सुरु केला. पाठलाग करताना ती सेक्टर-23 मध्ये पोहोचली असताना तिथे तिचा पती आणि दुसरी महिला आढळून आल्याने तिचा संताप अनावर झाला आणि तिने तिथे चांगलाच राडा केला.
महिलेने परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली असताना त्याने या महिलेला तिथे पत्नी म्हणून या फ्लॅटमध्ये ठेवले असल्याचे समोर आले आणि तिला रवींद्र यांच्यापासून चक्क दोन मुले देखील असल्याची माहिती पुढे आली. ही दोन मुले शहरातील खासगी शाळेत शिकत असून मुलाच्या वडिलांचे नाव रवींद्र असे शाळेत लावलेले आहे. पहिल्या पत्नीने रवींद्र यांच्याशी बोलले असता त्यानं टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्याचे ठोस पुरावे समोर ठेवताच तो तिला जीवे मारण्याच्या धमक्या देऊ लागला.
रवींद्र मान हा तरुण त्याच्या दोन पत्नींसह वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये राहत होता. तो वेळ काढून दोघींकडे जायचा मात्र त्याच्या दोन्ही पत्नींना या जराही भनक नव्हती. त्याला दोन्ही पत्नींपासून मुलेही आहेत. आपली पोलखोल झाल्याचे समजताच त्याने पहिल्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली असून पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून मुरथळ पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. लवकरच आरोपीला अटक करून पुढील कारवाई केली जाईल.