
महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना उपराजधानी नागपूर इथे उघडकीस आली आहे .नागपूरच्या एम्प्रेस मॉलमध्ये चौथ्या मजल्यावर एका तरुणाने आपल्या प्रेयसीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. बुधवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली होती.
उपलब्ध माहितीनुसार, संबंधित घटना ही नागपूर शहरातील गणेश पेठ पोलीस ठाणे हद्दीत एक्सप्रेस मॉल परिसरात घडली असून परिसरातील नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी या घटनेची पोलिसांना खबर दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले असता एक तरुणी जमिनीवर निपचित पडलेली होती तर तिच्या गळ्यावर काही खुणा दिसत होत्या. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि त्यानंतर पोलीस या तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. फरजाना (वय 21, रा. गिट्टीखदान) असे मृतकाचे तर मुजाहिद अन्सारी (वय 22 रा. मोमीनपुरा) असे मारेकऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरजाना आणि मुजाहिदमध्ये प्रेमसंबंध होते आणि ते दोघे लग्नही करणार होते मात्र काही दिवसांपूर्वीच फरजानाचे अन्य एका युवकासोबत लग्न ठरले त्यामुळे मुजाहिद संतापला आणि लग्नाआधी फक्त एकदाच मला भेट असा आग्रह करत त्याने तिला 2 डिसेंबरला बोलवले.
तिला घेऊन तो एम्प्रेस मॉलमध्ये आला आणि तेथील एका खोलीत दुपट्ट्याने गळा आवळून तिची हत्या केली व घरी गेला. दरम्यान तिच्या नातेवाइकांनी गिट्टीखदान पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी चौकशीसाठी मुजाहिद याला याला बोलाविले. फरजानाची हत्या केल्याचे त्याने मान्य केल्यानंतर हत्याकांडाचा उलगडा झाला.