नाशिकमध्ये खळबळ..भाजपा नेत्याच्या हत्येमुळे तणाव

शेअर करा

नाशिकमध्ये भाजपा नेत्याची हत्या झाल्याची माहिती समोर येताच शहरात तणावाचे वातावरण आहे. सातपूर भाजपा मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या झाली असून शहरात गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसत आहे . प्राथमिक माहितीनुसार, राजकीय पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सातपूर परिसरातील भाजपा मंडळ अध्यक्ष अमोल सकाळी कामगार युनियनच्या कामासाठी एमआयडीसी मध्ये गेले होते. त्यावेळी तिथे अंतर्गत वाद झाले आणि त्या वादातून धारदार शस्त्राने अमोल इघे यांच्यावर वार करण्यात आले. कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

अमोल इघे यांच्या हत्येनंतर भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आरोपींना लवकरात लवकर पकडून कडक कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. नाशिकमध्ये गेल्या पाच दिवसातील ही तिसरी हत्या आहे. काही दिवसांपूर्वी म्हसरुळला सराईत गुन्हेगाराची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. तर दोन दिवसांपूर्वी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेठरोडवरील आरटीओ कार्यालयाजवळ एका भाजी विक्रेत्याची डोक्यावर दगड टाकून हत्या करण्यात आल्याचं उघड झालं होतं.


शेअर करा