
नागपुरात एक वेगळीच घटना घडलेली असून पत्नीने पतीला पाहिले त्यावेळी त्याने गळफास घेतलेला होता आणि त्याच्याकडे फक्त काही क्षण शिल्लक होते. पत्नीने क्षणाचाही विलंब न करता पतीचे पाय वर उचलून धरले आणि आरडाओरडा सुरु केला. त्यानंतर लोक दाखल झाले आणि पतीची मृत्यूच्या दाढेतून सुटका केली. तीन दिवस कोमामध्ये राहिल्यावर पती व्यवस्थित झाला असून तो शुद्धीवर आलेला पाहताच महिलेच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे डोळे देखील या घटनेने पाणावले होते.
उपलब्ध माहितीनुसार , 38 वर्षीय महिलेच्या पतीने 25 ऑक्टोबर रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. पतीने स्टूलवर चढत घरातील पंख्याला दोरी बांधली आणि फास आपल्या गळ्यात लटकवला मात्र गळफास घेण्यासाठी त्याच्या पायाखालचा स्टूल पडला आणि त्याच्या आवाजाने पत्नीने घरात डोकावून पाहिलं तर तिला धक्काच बसला.
तात्काळ तिने पतीकडे धाव घेतली आणिआपली सर्व ताकद लावून पतीचे पाय वर उचलून धरले व आरडाओरडा सुरु केला.शेजाऱ्यांनी कोमात गेलेल्या पतीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं आणि तीन दिवस आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर पतीला शुद्ध आली. पतीला शुद्धीवर आल्याचं पाहून पत्नीचा आनंद गगनात मावत नव्हता. तिचे आनंदाश्रू पाहून वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे डोळे देखील पाणावले.