
महाराष्ट्रात अनेक खळबळजनक घटना रोज समोर येत असून अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात समोर आली आहे. शिरूर येथील डॉक्टर संदीप परदेशी यांचे शिरूरमधील ओळखीच्या तरुणाने अपहरण केले आणि त्यांच्याकडून तीन लाख रुपयांची खंडणी वसूल केली आणि त्यानंतर त्यांना सोडून दिले. पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले असून या प्रकरणी आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कुणाल सुभाष सिंग परदेशी ( राहणार शिरूर ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे . कुणाल याच्यासह सतीश मयुर राहून यश दानेश ( पूर्ण नाव माहित नाही ) अशा व्यक्तींवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉक्टर संदीप तुळशीराम परदेशी ( वय 59 ) यांना शुक्रवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास यातील काही आरोपींनी आजारपणाचा बहाणा करून बाहेर बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना एका मोटारीत जबरदस्तीने बसवून शिरूर चौफुला रोडवरील करडे घाट आणि त्यानंतर गव्हाणवाडी येथे नेत त्यांचे अपहरण केले. त्यांच्या गळ्यावर कोयता लावून जीवे मारण्याची धमकी देत कापडाने गळा आवळून त्यांना मारहाण केली त्यानंतर त्यांच्या खिशातील रोख 15 हजार रुपये गाडीच्या चाव्या, ऑक्सीमीटर आणि दुचाकी हिसकावून घेतली आणि त्यांना सोडण्यासाठी म्हणून तीन लाख रुपये खंडणी घेतली. त्यानंतर शनिवारी रात्री पाच तारखेला साडेबारा वाजता त्यांना नगर बायपास रोडवर सोडून दिले.
पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे अशाप्रकारे ही खळबळजनक घटना समोर आल्यानंतर विद्यार्थी आणि पालक वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थी आणि व्यसनाधीन झालेले तरुण मौजमजा आणि मस्ती करण्यासाठी असे गुन्हे करत असल्याने पोलिसांची चिंता वाढली असून सदर तरुणांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी परिसरात मागणी करण्यात येत आहे.