
गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले असून अशीच एक घटना विमान नगर येथे समोर आलेली आहे. व्यावसायिकावर भर दिवसा कोयता, लोखंडी सळी आणि धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्याकडील लॅपटॉप आणि रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पलायन केले मात्र विमानतळ पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांच्याकडून रोख रक्कम लॅपटॉप आणि धारदार शस्त्र जप्त केली आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, महादेव सुभाष साठे ( वय 21 ) , सोमनाथ संजय कांबळे ( वय 19 ), अनुराग भुजंग ससाने ( वय 19 सर्वजण राहणार विमान नगर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. सदर प्रकरणी सिद्धांत चंपालाल चोरडिया ( वय 30 राहणार आळंदी रस्ता ) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरडिया हे ३ फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास नगर रोडवरील आयटी पार्क जवळील एका दुकानासमोर सरबत घेण्यासाठी थांबले होते त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तीन जणांनी त्यांच्याकडे लॅपटॉप जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि लॅपटॉप परत देण्यासाठी फिर्यादीकडे अडीच हजार रुपयांची मागणी केली त्यानंतर दमदाटी करत त्यांनी फिर्यादीच्या खिशातील अडीच हजार रुपये आणि लॅपटॉप काढून घेतला तसेच फिर्यादी यांच्यावर प्राणघातक हल्ला करून ते पळून गेले.
पोलिसांनी तपास सुरू केला असता ते परिसरातील एका हॉटेलजवळ मोकळ्या जागेत बसले असल्याची खबर पोलिसांना मिळाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकातील उपनिरीक्षक सचिन जाधव, पोलिस कर्मचारी अविनाश शेवाळे, गणेश साळुंके यांच्या पथकाने सापळा रचून आरोपींना बेड्या ठोकल्या.