
महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना पुणे शहरात उघडकीस आली असून अनैतिक संबंधास नकार दिल्याच्या कारणावरून एका विवाहितेचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडलेली आहे. विमानतळ पोलिसांनी आरोपी गुलाम मोहम्मद शेख ( राहणार पठारे वस्ती मूळ राहणार बिहार ) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे मात्र आरोपी हा सदर महिलेचा मृतदेह बाथरूम मध्ये टाकून घराला कुलूप लावून फरार झालेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, लोहगाव येथील मोझे आळी परिसरात आरोपी गुलाम हा मयत महिलेच्या घरात भाड्याने राहत होता. दरम्यानच्या काळात त्याचे या महिलेसोबत घरमालकीण सोबत प्रेमसंबंध निर्माण झाले मात्र ही बाब मयत महिलेच्या घरी माहीत होताच त्यांनी आरोपीला तात्काळ घर खाली करण्यास सांगितले.
रविवारी दुपारी सदर महिला घरात एकटीच असताना गुलाम हा महिलेच्या घरात आला आणि त्याने तिचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर घराला कुलूप लावून तो पसार झाला. संध्याकाळी महिलेचा पती आणि मुले कामावरून घरी आल्यानंतर घराला कुलूप असल्याचे दिसताच महिलेला त्यांनी फोन लावला तर ती फोन उचलत नसल्याने अखेर त्यांनी रात्री उशिरा घराचा दरवाजा तोडला त्यावेळेस ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली.
सदर घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मयत महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गुलाम शेख याच्या विरुद्ध अनैतिक संबंधाला नकार दिल्याने गळा आवळून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृत्त लिहीपर्यंत फरार झालेल्या आरोपीला अटक करण्यात आली नव्हती.