पुण्यातील ‘ त्या ‘ फसवणूक प्रकाराची व्याप्ती वाढली

शेअर करा

कोरोना संकटानंतर अनेक नागरिकांचे अर्थकारण कोलमडले असून व्यावसायिक देखील मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडलेले आहेत मात्र त्याचा फायदा घेत मोबाईलच्या माध्यमातून कर्ज आणि परदेशातून देण्यात येणारे कर्ज अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे. पुण्यातील पिंपरी येथे असाच एक प्रकार समोर आलेला असून कर्ज देण्याच्या बहाण्याने तब्बल 40 ते 45 जणांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या तीन जणांना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने बेड्या ठोकलेल्या आहेत .

उपलब्ध माहितीनुसार, बालाजी उर्फ एकनाथ बळीराम घोडके ( वय 32 राहणार यवत दौंड ) , संग्रामसिंह अरुण राव यादव वय ( 40 राहणार कोल्हापूर ) , राजवीर उर्फ हसन अकबर मुजावर ( वय 30 राहणार कसबा बावडा कोल्हापूर ) अशी आरोपींची नावे आहेत. एका हॉटेल व्यवसायीकाला कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने अडीच लाखांचा या तिघांनी गंडा घातलेला होता. तपास सुरू असताना आरोपींनी अशाच पद्धतीने तब्बल 40 ते 45 जणांना फसवले असल्याचे समोर आले आहे.

तक्रारदार असलेले अमोल माणिकराव पाचपुते यांना हॉटेलचे नूतनीकरण करण्यासाठी पाच कोटी रुपयांची आवश्यकता होती त्यावेळी आरोपी बालाजी याने त्याच्याच साथीदारांना सोबत घेत एका फायनान्स कंपनीकडून तुम्हाला पाच कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो असे सांगून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली तसेच ऍडव्हान्स हप्ता म्हणून दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये घेतले होते. सदर प्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अमोल यांनी पोलिसात धाव घेतली होती. गुन्हे शाखा युनिट चार चे पोलिस पथक आरोपीचा शोध घेत होते त्यानंतर सर्वप्रथम बालाजी घोडके याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर इतरही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.


शेअर करा