पूजेचे साहित्य चक्क चारचाकी गाडीवर फेकून मारले , महिला भाविकाच्या डोळ्याला इजा

शेअर करा

नगर जिल्हा हा तीर्थक्षेत्रांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो मात्र परगावावरून आलेल्या भाविकांना अनेकदा जबरदस्तीने पूजेचे साहित्य देण्यासाठी त्रास दिला जातो. पूजेचे साहित्य आपल्याकडूनच विकत घ्या असा आग्रह करत त्यांना धमकावण्याच्या देखील घटना अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत अशीच एक घटना मोहटागडावर उघडकीला आली असून स्थानिक व्यावसायिक महिलेने नारळ आणि पूजेचे साहित्य फेकल्यामुळे चार चाकी गाडीची काच फुटली असून भाविक महिलेच्या डोक्याला नारळ लागून दुखापत झालेली आहे. धक्कादायक म्हणजे यानंतरही बाहेरगावावरून आलेल्या या भावीकाशी हुज्जत घालून तेथील व्यावसायिक महिलांनी त्यांच्या खिशातील पैसे काढून घेतल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी मोहटादेवी गडावर घडलेला आहे. पोलिसांनी सिंधुबाई डमाळे या महिलेला या प्रकरणात अटक केली आहे.

तक्रारदार व्यक्ती हे नगर तालुक्यातील सोनेवाडी येथील रहिवासी असून ते आपल्या कुटुंबियासह गडावर दर्शनासाठी शुक्रवारी गेले होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास ते मोहटादेवी येथे पोहोचले त्यावेळी गडाच्या पायथ्याला पूजेचे साहित्य विकणाऱ्या महिलेने प्लास्टिकची पिशवी त्या गाडीच्या दिशेने फेकली. त्यामध्ये नारळ आणि पूजेचे साहित्य होते. नारळ जोरदारपणे काचेवर आदळल्याने काच फुटली आणि आणि त्याच वेळी दुसऱ्या महिलेने पुजेच्या साहित्याची दुसरी प्लास्टिक पिशवी फेकली त्यामध्ये तक्रारदार यांच्या पत्नीच्या डोळ्याला जखम झाली.

तक्रारदार व्यक्तीने गाडी थांबवून त्यांना विनाकारण पिशव्या का फेकता ? माझ्या पत्नीच्या डोळ्याला दुखापत झालेली आहे असे विचारले तसेच आम्हाला पूजेचे साहित्य नको आहे ते परत घ्या असे म्हटल्यानंतर या महिलांनी तिथे दमदाटी करत जास्त बोलू नको आता गुपचूप 200 रुपये काढून दे असे सांगत संबंधित व्यावसायिकाला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या खिशातून जबरदस्तीने तीनशे रुपये काढून घेतले.

सदर घटनेनंतर परिसरात आरडाओरडा सुरू झाल्याने देवस्थानचे सुरक्षारक्षक तिथे आले आणि त्यांनी मध्यस्थी करून तक्रारदार यांची सुटका केली. तक्रारदार यांच्या पत्नीच्या डोळ्याला दुखापत झाल्याने त्यांना दवाखान्यात नेण्यात आले आणि त्यानंतर तक्रारदार यांनी सिंधुबाई रोहिदास डमाळे व बाळाबाई भानुदास शिरसाठ या दोन्ही महिलांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.

नगर जिल्ह्यात बहुतांश धार्मिक ठिकाणी अशाच पद्धतीने परगावावरून आलेल्या नागरिकांना त्रास देण्यात येतो. पूजेचे साहित्य आपल्याकडूनच घ्यावे इथपासून तर व्हीआयपी दर्शनपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने नागरिकांकडून पैसे उकळले जातात. विरोध केल्यास भाविकांना मारहाण देखील करण्यापर्यंत काही प्रकरणे गेलेली आहेत.पोलीस दलाकडून देखील अनेकदा स्थानिक लोकांचीच बाजू ऐकून घेतली जाते त्यामुळे जिल्ह्याचे नाव विनाकारण खराब होत आहे .


शेअर करा