बीड हादरले..अवघ्या एक वर्षांपूर्वी विवाह झालेल्या दाम्पत्याचे मृतदेह आढळले

शेअर करा

महाराष्ट्रात बीड इथे एक धक्कादायक घटना समोर आली असून अवघ्या वर्षापूर्वी विवाह झालेल्या एका दाम्पत्याचे मृतदेह राहत्या घरात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर परिसरात वेगवेगळी चर्चा सुरु झाली असून अद्यापपर्यन्त मृत्यू हे आत्महत्या आहे की वेगळाच काही प्रकार आहे याबद्दल माहिती समोर आलेली नाही. राजेश भालचंद्र जगदाळे (वय २६) व दीपाली राजेश जगदाळे (वय २४) असे या दाम्पत्याचे नाव असल्याचे समजते .

उपलब्ध माहितीनुसार , बीड जिल्ह्यातील नेकनुर परिसरात वैतागवाडी (ता. बीड) येथे गर्भवती पत्नीसह पतीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे . गुरुवारी १६ तारखेला सायंकाळी कुटुंबीय शेतात गेले होते तेव्हा हे दोघेच घरी होते. कुटुंबीय परतले असताना त्यांनी दरवाजा बंद पाहून आवाज दिला त्यावेळी दरवाजा उघडत नसल्याचे पाहून कुटुंबीयांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असताना ही धक्कादायक बाब समोर आली आहे . दीपाली जगदाळे हीचा मृतदेह खाटेवर पडलेला होता तर राजेश जगदाळेचा मृतदेह घराच्या लोखंडी आडुला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे .

सदर घटनेची माहिती मिळताच नेकनुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, परमेश्वर सानप, प्रशांत क्षीरसागर यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नेकनूरच्या कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आला. उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतर या दोघांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे . स्थानिकांच्या मते त्यांचा संसारही सुरळीत चालू होता त्यामुळे त्यांच्या मृत्यूच्या कारणांची चर्चा परिसरात रंगली आहे .


शेअर करा