बीबीसीवर इन्कमटॅक्सची कारवाई , अमोल मिटकरी म्हणाले , ‘ अडाणीच पाप.. ‘

शेअर करा

आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्था अशी ओळख असलेल्या बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई येथील कार्यालयात आयकर विभागाची पथकं दाखल झाली आहेत. आयकरच्या नियमांचं उल्लंघन झाल्याच्या कथित तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले जात असले तरी केंद्र सरकार बदल्याच्या भावनेतून ही कारवाई करत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. बीबीसीकडून काही दिवसांपूर्वी मोदी द इंडिया क्वेशन ही डॉक्युमेंटरी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि वादात सापडल्यावर त्यावर बंदी देखील घालण्यात आले होती.

बीबीसी हा विदेशी आंतरराष्ट्रीय माध्यमसमूह असून बीबीसीकडून आयकर कायद्याच्या नियमांचा भंग झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्राथमिक सर्वेक्षण करण्यात करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयात आयकरची पथकं धडकली आहेत तर काही कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील बीबीसीच्या बांद्रा कुर्ला येथील कार्यालयात देखील आयकरचं पथक पोहोचलं असून चाचपणी सुरु असल्याची माहिती आहे तर दिल्ली येथील काही कर्मचाऱ्यांना लवकर घरी पाठवलं आहे.

बीबीसीनं गुजरात दंगलींच्या संदर्भातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत एक डॉक्युमेंटरी प्रसिद्ध केली होती. मोदी : द क्वेशन इंडिया ही डॉक्युमेंटरी प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्यावरुन वादंग निर्माण झाला होता. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं डॉक्युमेंटरीवर बंदी घातली होती. डॉक्युमेंटरी ट्विटर आणि यूट्यूबवरुन देखील हटवण्यात आली होती. यानंतर डॉक्युमेंटरी वाद सुप्रीम कोर्टात देखील पोहोचला असून सुनावणी प्रलंबित आहे.

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी आपले मत व्यक्त केले असून , ‘ देशात अघोषित आणीबाणीला सुरुवात ! अदानीचे पाप झाकण्यासाठी मोदी सरकारकडून बीबीसी कार्यालयावर IT च्या धाडी.. मोदी सरकारकडून राजरोस लोकशाहीचा खुन ! जागरूक नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे.#जागो भारतवासी ,’ असे ट्विट केले आहे .


शेअर करा