
मुंबईतील आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी साक्षीदार बनलेला किरण गोसावी लखनऊमध्ये शरण येणार आहे. किरण गोसावीवर त्याच्या अंगरक्षक प्रभाकर साईलने शाहरुखकडून कोट्यवधीची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. ड्रग्ज प्रकरण समोर आल्यापासून गोसावी चर्चेत आहे. सुरुवातीच्या काळात आर्यन खानसोबत त्याचा एक सेल्फीही व्हायरल झाला होता. मात्र त्यानंतर किरण गोसावी फरारच झाला. दरम्यान आता किरण गोसावी उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांना शरण येणार आहे. यापुर्वी पुणे पोलिसांनी त्याच्या मैत्रिणीला अटक केली आहे.
गोसावीने इंडिया टुडेला सांगितले, “मला स्वतःला महाराष्ट्र पोलिसांकडे सोपवायचे होते, परंतु या राजकीय मुद्यांमुळे मी स्वतःला लपवत होतो. मला क्रूज पार्टी ड्रग प्रकरणाबद्दल सत्य सांगायचे आहे. पुण्यात अटकेनंतर माझा वाईट छळ होईल असे मला कोणीतरी सांगितले होते. मी १५ मिनिटांत शरण जाणार आहे. महाराष्ट्रात माझा जीव धोक्यात आहे, त्यामुळे मी लखनौमध्ये आत्मसमर्पण करणार आहे. मला सातत्याने धमकीचे फोन येत आहेत.”
अंगरक्षक प्रभाकर साईलने केलेला खंडणीचा आरोप फेटाळून लावत गोसावी म्हणाला की, “जर त्याने आरोप लावले असतील तर त्याच्याकडे पुरावेही असतील. त्याने ते पुरावे समोर ठेवले पाहिजेत. मी पैसे घेतलेले नाहीत. आतापर्यंत स्वत:ला वाचवण्यासाठी मी लपून बसलो होतो, मात्र आज मी आत्मसमर्पण करणार आहे.”