
महाराष्ट्रात पोलिसांची लाचखोरी ही काही नवीन राहिलेली नाही मात्र अनेकदा मानवतेच्या मर्यादा देखील काही भ्रष्ट पोलिसांकडून पार पाडल्या जातात अशीच एक घटना औरंगाबाद येथे उघडकीस आली असून पोलीस उपनिरीक्षक असलेल्या एका अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने दहा हजार रुपये लाच घेताना पकडले आहे. दौलताबाद पोलीस ठाण्यासमोर हा अधिकारी लाच घेत असताना मंगळवारी त्याला रंगेहात पकडण्यात आलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, रविकिरण अगतराव कदम ( वय 39 ) असे पकडल्या गेलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे.दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात तक्रारदार व्यक्ती यांच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि सदर अपघात प्रकरणी तक्रारदार मोटार वाहन अपघात न्यायालयात नुकसानभरपाईचा दावा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात हेलपाटे मारत होते.
दावा दाखल करण्यासाठी त्यांना अपघातस्थळाचा पंचनामा, शवविच्छेदन पूर्वीचा पंचनामा, एफआयआरची प्रत आणि इतर काही कागदपत्रांची आवश्यकता होती. अपघाताचा तपास पोलीस उपनिरीक्षक रविकिरण कदम याच्याकडे होता त्यामुळे तक्रारदार यांनी कदम यांना संबंधित कागदपत्रे देण्याची विनंती केली होती त्यासाठी कदम याने दहा हजार रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांनी आधीच वडिलांच्या अपघाती निधनानंतर आम्ही दुःखी आहोत आणि आर्थिक परिस्थिती देखील खराब आहे अशी वारंवार विनंती केली मात्र कदम याने तक्रारदार याची विनंती धुडकावून लावत सदर पैसे द्यावेच लागतील अशी मागणी केली. त्याशिवाय कागदपत्रे देणार नाही असेही दरडावले. हतबल झालेल्या तक्रारदार यांनी अखेर लाचलुचपत विभागाकडे तक्रार सोमवारी तक्रार दिली आणि कदम याला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला . त्यानुसार दौलताबाद ठाण्याच्या परिसरात सकाळपासून सापळा रचून वाट पाहणाऱ्या पथकाच्या हाताला कदम लागला त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.