
महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून आरोपीने गुन्हा करताना चक्क क्रूरतेची परिसीमा गाठली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील बेंबळी इथे हा प्रकार उघडकीस आला असून पीडित तरुणी ही मतिमंद असल्याचे असल्याचे समजते. मुलीसोबत कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार तर केलेच मात्र तिला बेदम मारहाण देखील केली.
उपलब्ध माहितीनुसार , उस्मानाबाद जिल्ह्यातील बेंबळी येथील ही पीडित तरुणी मतिमंद आहे. तिला अधूनमधून वेडाचे झटके येतात अन ते आल्यावर ती कुणालाही मारहाण करते त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींनी बाहेर जाताना तिला कोंडून घेण्यासाठी एक पत्र्याचे शेड उभारले आहे . बाहेर जायचे झाले तर कुटुंबीय या मुलीला कोंडून बाहेर जातात मात्र तिला अन्न पाणी देण्यासाठी एक व्यक्ती शेडच्या बाहेर असते.
घटना घडली त्या दिवशी मुलीसोबत तिचे वडील होते मात्र वडील देखील आजारी असल्याने त्यांना उपचार घेण्यासाठी गावात जायचं होतं म्हणून वडिलांनी पीडितेला शेडमध्ये ठेवून बाहेरून कुलूप लावलं आणि गावात निघून गेले मात्र त्यांना उशीर झाल्याने ते उपचार घेतल्यानंतर शेतात गेलेच नाहीत त्यामुळे पीडित तरुणी ही एकटीच शेडमध्ये होती. सदर तरुणी ही शेडमध्ये एकटीच असल्याचे आरोपीने हेरले आणि शेडचं कुलूप तोडून मतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. तरुणीने विरोध केला असताना त्याने तिला बेदम मारहाण देखील केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा वडील शेतात गेले तेव्हा शेडचं कुलूप तोडलेल्या अवस्थेत होतं तर आतमध्ये तरुणी जखमी अवस्थेत पडली होती.आपल्या मुलीला अशा अवस्थेत पाहून वडिलांच्या पायाखालीच जमीनच सरकली आणि त्यांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केले.पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर बेंबळी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे .