महिलेच्या गालाचा चावा प्रकरणात आरोपी निर्दोष , न्यायालय म्हणाले ..

शेअर करा

महाराष्ट्रात औरंगाबाद येथे एक वेगळीच घटना समोर आलेली असून दोन्ही जावांमध्ये झालेल्या भांडणानंतर एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या गालाचा चावा घेतला आणि प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता मात्र न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष सुटका केली आहे.

संपत्ती असलेल्या वादातून हा प्रकार घडला होता. मीनाबाई सोमनाथ पल्हाटे असं फिर्यादी महिलेचं नाव असून काही दिवसांपूर्वी फिर्यादी मीनाबाई यांचा आपली थोरली जाऊबाई सुनीता यांच्यासोबत घराच्या मुद्यावरून वाद झाला होता. घटनेच्या दिवशी थोरली जाऊ सुनीता यांनी फिर्यादी मीनाबाई यांच्या पतीला घरातून बाहेर जाण्यास सांगितलं होतं तर सासऱ्यांनी बांधलेल्या घरावर आमचाही हक्क असल्याचं मीनाबाई यांनी यावेळी सुनावलं होतं.

रागाच्या भरात सुनीता यांनी आपली धाकटी जाऊ मीनाबाई यांच्या गालावर चावा घेतला. मीनाबाई यांनी मुकुंदनगर पोलीस ठाण्यात सुनीता आणि तिचे पती रमेश यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली होती. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर, दात हे घातक शस्त्र असू शकतं का? अशी विचारणा कोर्टानं केली होती. दातने चावा घेतल्यामुळे मृत्यू होऊ शकतो, हे सिद्ध करण्यास फिर्यादी पक्षाला अपयश आलं. त्यामुळे न्यायालने पुरावे, साक्षीदार आणि युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर दोघांची निर्दोष सुटका केली आहे.

जिल्हा न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एच. खेडकर यांनी हा निकाल दिला आहे. दात हे प्राणघातक हत्यार असू शकत नाही, असं निरीक्षणही यावेळी त्यांनी दिलं आहे. साक्षीतील तफावत आणि दाताने चावा घेतल्यामुळे झालेल्या जखमा या बाबी आरोपींना शिक्षा देण्याइतपत विश्वासार्ह वाटत नसल्याचं निरीक्षण नोंदवत न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष सुटका केली आहे.


शेअर करा