
चोरी करण्यासाठी चोर काय शक्कल लढवेल याचा काही भरवसा राहिलेला नाही अशीच एक घटना पुणे येथे उघडकीला आली असून वारजे येथे एका सराफ व्यावसायिकाच्या शेजारचे दुकान चोरट्यांनी भाड्याने घेतले आणि त्यानंतर दुकानाच्या मधील भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी सराफ दुकानातून लाखो रुपयांच्या दागिन्यांची लूट केली अशी घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, वारजे इंडिया रोडवरील लक्ष्मी माता येथील माऊली ज्वेलर्स या सराफ दुकानात शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली होती. चोरट्यांनी एक किलो पेक्षा जास्त सोन्याचे दागिने चोरून नेले असा संशय आहे तर नक्की किती किमतीचा माल चोरीला गेला आहे याची माहिती सराफ व्यावसायिक पोलिसांना देत आहेत.
माऊली ज्वेलर्स त्यांच्या शेजारच्या दुकानात गाड्यांमध्ये चोरट्यांनी मसाल्याचा व्यवसाय करायचा आहे म्हणून गाळा भाड्याने घेतला होता. त्या दुकानात फर्निचरचे देखील काम करत आहोत असे सांगून त्यांनी काही काम देखील सुरु केले होते. नवीन दुकान असल्याने काम सुरू आहे म्हणून आवाज येत असेल असे समजून सर्वांनी त्या आवाजाकडे दुर्लक्ष केले मात्र प्रत्यक्षात चोर भिंत फोडत होते.
शुक्रवारी दुपारी माऊली ज्वेलर्स बंद होते त्याचा फायदा घेत चोरट्यांनी दोन दुकानांच्या मध्ये असलेल्या भिंतीला मोठे भगदाड पाडले आणि त्यानंतर शेजारच्या दुकानात प्रवेश मिळवला आणि तेथून सोन्याचे दागिने घेऊन ते पसार झाले. पोलीस तपास सुरू असून वृत्त लिहीपर्यंत चोरटे पकडण्यात पोलिसांना यश आले नव्हते.