वेगळंच..कोब्राच्या मृत्यूप्रकरणी इंजिनीअर विरोधात गुन्हा दाखल: काय आहे प्रकरण?

शेअर करा

देशात एक वेगळीच पण विचित्र अशी बातमी समोर आली असून आतापर्यंत आपण खून, बलात्कार किंवा चोरी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याच्या बातम्या वाचलेल्या असतील मात्र कर्नाटकमध्ये चक्क एका इंजिनीअरवर कोब्रा सापाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अभियंता के.व्ही विजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वनविभागाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे .

उपलब्ध माहितीनुसार , स्मार्ट सिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने नुकतंच शहरातील सागर रोडजवळील अनधिकृत अंजनेय मंदिर पाडण्याचं काम सुरू केलं आहे. मंदिराचे बांधकाम सुरु असताना इथे एक कोब्रा साप निघाला. नियमाप्रमाणे इंजिनीअर यांनी या सापाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही आणि काम सुरू असताना यात कोब्रा सापाचा मृत्यू झाला आणि वनविभागाने अभियंता केव्ही विजय कुमार यांच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

शंकरा वन परिक्षेत्रातील सूत्रांनी सांगितले की, स्मार्ट सिटी मिशनच्या अधिकाऱ्यांनी शहरातील विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी अनेक बांधकामे जमीनदोस्त करण्याची मोहीम राबवली. ही मोहीम सुरू असतानाच मंदिराजवळ एक कोब्रा दिसला. मात्र, याबद्दल वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्याऐवजी किंवा त्याच्या बचावासाठी पाऊले उचलण्याऐवजी अभियंत्याने मोहीम सुरूच ठेवली होती त्यामुळे सापाचा मृत्यू झाला आणि या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.


शेअर करा