
देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना डोंबिवली इथे उघडकीस आली असून चक्क सुशिक्षित लोकांना जाळ्यात ओढून लाखो रुपयांना लुटणाऱ्या भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे. जळगावमधून या भोंदूबाबाला धरले असून त्याने आतापर्यंत तब्बल ३२ लाखांना लोकांना चुना लावलेला असल्याचे समजते . पवन बापुराव पाटील असे या बाबाचे नाव असून त्यांचं वय 28 वर्ष आहे.
उपलब्ध माहितीनुसार , सुशिक्षितांना गंडा घालणारा हा तरुण हातचलाखीत तरबेज होता. लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी या भोंदूबाबानं स्वतःच्या हातातून कधी खडीसाखर, कधी कुंकू यामध्ये देवीची चांदीची प्रतिमा काढून दाखवण्यास सुरुवात केली आणि लोकांनी त्याच्याकडे गर्दी सुरु केली. पुढे पुढे त्याने लोकांवर करणी करण्यात आल्याची भीती घालून लुबाडण्यास सुरुवात केली. भोंदूबाबानं आपल्या आणि आपल्या आईच्या बँक अकाऊंटमध्ये 2019 पासून आतापर्यंत वेळोवेळी 31 लाखापेक्षा जास्त रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे .
32 वर्षांच्या प्रियांका राणे यांनी डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात या तरुणानं आपला विश्वासघात करुन फसवणूक केली असल्याची तक्रार दाखल केली होती. प्रियंका राणे यांची आई राहत असलेल्या घरी येऊन या भोंदूबाबानं सगळ्यांना भुरळ घातली होती. प्रियंका यांच्यासह त्यांचा भाऊ आणि आईला त्यांच्या अंगात सप्तश्रृंगी देवी संचारत असल्याचं भासवून या भोंदूबाबानं लुबाडलं होतं. अखेरीस पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार कारवाई करत थेट जळगावातून या तरुणाला अटक केली आहे.