सकाळी बढतीचे हारतुरे अन संध्याकाळी पन्नास हजाराची मागणी

शेअर करा

भ्रष्टाचार रोखण्यासाठी कितीही प्रकार केले तरी जोपर्यंत अधिकाऱ्यांच्या मानसिकतेत बदल होत नाही तोपर्यंत असे प्रकार रोखणे कठीण असल्याचे दिसून येत आहे. अशीच एक घटना बीड येथे समोर आलेली असून बढती मिळाली म्हणून सकाळी सत्कार स्वीकारला आणि संध्याकाळी चाळीस हजार रुपये लाचेची मागणी केली, अशाच एका पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पाटोदा पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक आफरोज तैमूरखान पठाण यांना बीडच्या एसीपी पथकाने लाचलुचपत पथकाने 11 मार्च रोजी संध्याकाळी अटक केली होती. जबरी लुटीचा गुन्हा नोंद असलेल्या तक्रारदारास तपासात मदत करण्यासाठी आणि जप्त केलेला मोबाईल व इतर मुद्देमाल परत करून तक्रारदाराच्या भावाचा जामीन रद्द न होण्यासाठी पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर चाळीस हजार देण्याचे ठरले होते मात्र दरम्यानच्या काळात पठाण यांना संशय आला आणि त्यांनी लाच स्वीकारलीच नाही.

उपनिरीक्षक अफरोज पठाण हे मूळचे लातूरचे असून लाच मागणीच्या गुन्ह्यात त्यांना अटक केल्यानंतर बीडच्या लाचलुचपत विभागाने त्यांच्या पाटोदा येथील निवासस्थानाची देखील झडती घेतली तर लातूर लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांच्या मूळ गावी जात घरी देखील तपासणी केली आहे.


शेअर करा