
महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकारने एक वेगळा निर्णय घेतलेला असून या निर्णयावरून राज्यात मोठ्या प्रमाणात वादंग होण्याची शक्यता आहे. अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांनी आता फोनवर हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणत संभाषणाला सुरुवात करावी अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
वंदे मातरम आपले राष्ट्रगीत आहे. हा केवळ एक शब्द नसून भारतीयांचे भारत मातेविषयी भावनांचे प्रतीक आहे. १८७५ मध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले गीत त्या काळातील स्वातंत्र्य सैनिकांसाठी ऊर्जा देण्याचे काम करत होते असेही ते पुढे म्हणाले. ‘ हे माते मी तुला प्रणाम करतो ‘ असे म्हणत बंकिमचंद्र चटर्जी यांनी देशभक्तीचे स्फुल्लिंग तमाम भारतवासीयांमध्ये जागवले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्द असल्याने त्याऐवजी कार्यालयात ‘ वंदे मातरम ‘ म्हणून संभाषण सुरू करणार आहोत.
१८०० साली टेलिफोनचा उगम झाल्यानंतर हॅलो शब्दाने आपण सर्वजण संभाषण करायचो मात्र आता यापुढे हॅलोऐवजी वंदे मातरम या शब्दाने संभाषण सुरू करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलेला आहे. या संदर्भातील आदेश लवकरच जारी करण्यात येईल असेही ते पुढे म्हणाले.