
महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना भिवंडी इथे उघडकीस आली असून एका पतीने चक्क त्याच्या घरात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला असून पीडित मुलीला न्याय मिळावा आणि आपल्या पतीला कठोर शिक्षा व्हावी म्हणून सदर व्यक्तीच्या पत्नीने पोलीस ठाणे गाठत आपल्या पतीच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या नराधमाला गजाआड केले असून लडकू मुकणे असे या आरोपीचे नाव आहे .
उपलब्ध माहितीनुसार , पीडित मुलीच्या वडिलांचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले आणि त्यानंतर तिची आई देखील मुलीला वाऱ्यावर सोडून एका पर-पुरुषासोबत निघून गेली. त्यामुळे आईवडिलांचे छत्र हरवलेल्या असाह्य अल्पवयीन पीडितेला भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात आरोपीने नातवंड सांभाळणे तसेच घराच्या बकऱ्या चरण्यासाठी तिला कामाला ठेवले .
मे महिन्यात पीडित मुलगी जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेली असता आरोपी तिथे पोहचला आणि तिला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जंगलात कोणी नसल्याचा फायदा घेऊन तिच्यावर प्रथम बलात्कार केला. ‘ कुणाला सांगशील तर तुला मारून टाकीन ‘ अशी धमकी तो सातत्यानं तिच्यावर अत्याचार करू लागला.
13 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलीवर आरोपी मालक राहत्या घरात अत्याचार करीत असल्याचे आरोपीच्या पत्नीने पाहिल्यानंतर तिला धक्काच बसला आणि आरोपीच्या पत्नीने शेजारी राहणाऱ्या एका महिलेला आपल्या पतीच्या या नीचपणाची हकीकत सांगत “माझ्या पतीने आमच्या घरी राहणारी मुलगी बरोबर बळजबरी संबंध केले आहेत काहीतरी करा” असे सांगितले. श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते तत्काळ तिथे पोहचले आणि या मुलीची सुटका करण्यात आली. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात अत्याचारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.