
महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना पुणे येथे उघडकीस आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून त्यांचा पीए असल्याचे भासवत एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडून वीस लाखाची खंडणी मागण्यात आली. त्यातील दोन लाख घेण्यासाठी आलेल्या सहा जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. बांधकाम व्यवसायिक अतुल जयप्रकाश गोयल ( वय 47 राहणार वानवडी ) यांनी बंडगार्डन पोलिसांकडे यासंदर्भात फिर्याद दिली होती.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, नवनाथ भाऊसाहेब चोरमले ( वय 28 ) सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे ( वय 28 ), आकाश शरद निकाळजे ( वय 24 तिघेही राहणार ता. हवेली ), सौरभ नारायण काकडे ( वय 20 राहणार हडपसर ) , किरण रामभाऊ काकडे ( वय 25 ) चैतन्य राजेंद्र वाघमारे ( वय 19 राहणार भेकराईनगर फुरसुंगी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत .
किरण काकडे हा याचा मुख्य सूत्रधार असून त्याने गुगल प्ले स्टोर मधून एक फेक कॉल ऐप डाउनलोड केले होते. त्यात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल नंबरचा वापर केला. दहा दिवसांपूर्वी अतुल गोयल यांना फोन करून आपण पवारांचा पीए चौबे बोलत असल्याचे भासवले आणि वीस लाख रुपयांची खंडणी मागितली. पोलीस तपासात हा प्रकार उघड झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.