
आपल्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांना मंत्रालयात प्रवेश देत नसल्याने संतप्त झालेले एकनाथ शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांनी चक्क पोलिस शिपायाला शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. गुरुवारी ही घटना घडली असून सदर प्रकरणाचा अहवाल पोलिसांनी गृह खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवलेला असून आता पोलिसांकडून काय भूमिका घेतली जाणार याची चर्चा सुरू झालेली आहे.
आमदार संतोष बांगर हे आपल्या 25 ते 27 कार्यकर्त्यांसह मुख्य प्रवेशद्वारातून मंत्रालयात प्रवेश करत होते त्यावेळी तिथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांना अडवले त्यामुळे संतोष बांगर यांचा संताप अनावर झाला . इतक्या कार्यकर्त्यांना पास किंवा पत्राशिवाय प्रवेश देऊ शकत नाही अशी भूमिका पोलिसाने घेतल्याने संतप्त झालेल्या बांगर यांनी पोलिस शिपायाला शिवीगाळ केली तसेच ‘ माझ्याकडे जर पिस्तूल असते तर तुम्हाला गोळ्या घातल्या असत्या ‘ असा देखील दम दिला त्यानंतर पोलिसांनी दैनंदिन कक्षात याची नोंद केली तर दुसरीकडे संतोष बांगर यांनी असा कुठलाही प्रकार झाला नाही. आपल्या सर्व कार्यकर्त्यांची प्रवेशद्वारावरच नोंद करून मग मंत्रालयात प्रवेश केला असे म्हटले आहे .