
पुणे जिल्ह्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असून अशीच एक घटना ओतूर येथील आठवडे बाजारात समोर आलेली आहे . 25 तारखेला एका तरुणाने एका तरुणीला बाजारात अडवत तिला चाकूने जखमी केलेले असून तरुणीच्या मदतीला एक महिला आली त्यावेळी आरोपीने तिच्यावर देखील वार केले आणि त्यानंतर स्वतःच्या पोटात वार करून स्वतःलाही जखमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, वर्षा शांताराम खरात ( वय 32 राहणार जांभळे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर ) आणि ज्योती अंबादास वाघमारे ( वय 35 राहणार ओतूर तालुका जुन्नर ) अशी या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलांची नावे असून संतोष मारुती ठोसर ( राहणार मानदारणे तालुका जुन्नर ) असे हल्लेखोर व्यक्तीचे नाव आहे.
गुरुवारी ओतूरचा आठवडेबाजार असल्याकारणाने घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्यावेळी संतोष हा अचानकपणे समोर आला आणि त्याने वर्षा खरात यांच्यावर चाकूने वार केले. त्याच्या हातात चाकू असल्याचे पाहून कोणीही पुढे जाईना हे पाहून अखेर महिलेच्या सोबत असलेल्या ज्योती वाघमारे या पुढे गेल्या तर आरोपीने त्यांच्यावरही वार केले त्यात त्यादेखील जखमी झालेल्या आहेत.
त्यांच्यावर वार केल्यानंतर आरोपीने स्वतःच्या देखील पोटात दोन ते तीन वेळा चाकू भोसकून आत्महत्येचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ त्यांना आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल केलेले असून संतोष ठोसर याला नारायणगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. सदर प्रकार का घडला याचा सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे तपास करत आहेत .