
महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार डोंबिवलीत समोर आलेला असून भारतीय जनता पार्टीशी संबंधित असलेले जेष्ठ पदाधिकारी नंदू जोशी यांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात चक्क विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद झालेली आहे. नंदू जोशी यांनी एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी केली असा आरोप त्यांच्यावर आहे. जोशी यांनी हा आरोप फेटाळलेला असून भाजपच्या वतीने तपासाच्या आधीच जोशी यांच्या बाजूने आंदोलन करण्यात येणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार , पीडित महिलेचे पती पोलीस दलात अधिकारी असून पती आणि पत्नीत वाद सुरू आहे. पोलीस अधिकारी हे नंदू जोशी यांचे मित्र असून या कालावधीत नंदू जोशी यांनी पीडित महिलेला घर रिकामे कर आणि माझ्यासोबत तू शरीरसंबंध ठेव अशा धमक्या दिलेल्या आहेत असे महिलेचे म्हणणे आहे.
महिलेच्या म्हणण्याप्रमाणे 2018 पासून तर 2023 पर्यंत हा प्रकार सातत्याने घडत होता. आरोपी नंदू जोशी राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने तसेच पतीच्या ओळखीचे असल्याने आपण आतापर्यंत या गोष्टीकडे दुर्लक्ष केले मात्र अखेर त्यांच्याकडून होणारा त्रास असह्य होत असल्याने पोलीस ठाण्यात विनयभंग आणि धमकावणे यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नंदू जोशी यांनी देखील या प्रकरणावर आपली भूमिका मांडताना , ‘ मी या महिलेला कधीही भेटलो नाही. तिला कधी साधा कॉल देखील केलेला नाही. तिचे पती माझे मित्र आहेत आणि त्यांच्यात वाद सुरू आहे याची मला कल्पना असल्याने तसेच मी तिच्या पतीला मदत करतो असा तिचा संशय असल्याने माझ्यावरती बिनबुडाचे आरोप केलेले आहेत असे म्हटलेले आहे.