
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हनीट्रॅप प्रकार गुन्हेगारी वाढलेली असून असाच एक अनुभव ठाणे शहरातील एका कार्पोरेट कंपनीत सल्लागार पदावर काम करणाऱ्या एका चाळीस वर्षीय व्यक्तीला आलेला आहे. एका अनोळखी नंबरवरून त्याला व्हाट्सअपला कॉल आलेला होता. त्याने तो कॉल उचलला त्यावेळी एक महिला त्याच्यासोबत बोलत होती आणि बोलता बोलता तिने अचानकपणे तिचे कपडे काढण्यास सुरुवात केली त्यानंतर या व्यक्तीला धमकावत त्याच्याकडून सहा लाख 50 हजार रुपये उकळण्यात आलेले आहेत. सातत्याने पैशाची मागणी होऊ लागल्याने अखेर या व्यक्तीने या महिलेच्या विरोधात तक्रार दिलेली आहे.
पीडित व्यक्तीने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, 17 मार्च रोजी त्याला एका अनोळखी नंबरवरून व्हाट्सअपवर व्हिडिओ कॉल आलेला होता. कुणाचा फोन आहे म्हणून त्याने सहज फोन उचलला त्यावेळी समोर एक महिला त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होती. तिचे बोलणे तो ऐकून घेत असतानाच अचानकपणे तिने तिच्या अंगावरील कपडे काढण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर या व्यक्तीने हा कॉल कट केला.
काही वेळानंतर या महिलेने त्याला एक व्हिडिओ आणि त्याच्यातील काही स्क्रीन शॉट पाठवले यामध्ये या व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग केलेले होते त्यामध्ये त्याचा देखील चेहरा व्हिडीओ कॉल असल्याने दिसून येत होता. काही दिवसांनी या व्यक्तीला एका अनोळखी नंबरवरून फोन आला त्यावेळी त्याने त्यावेळी समोरील माणूस हा पुरुष होता आणि त्याने आपली त्याची ओळख दिल्लीचे पोलीस आयुक्त अशी सांगितली हे ऐकून समोरील व्यक्ती घाबरून गेला.
बनावट पोलीस आयुक्ताने यावेळी स्वतःचे नाव सांगत सदर महिला ही सेक्स रॅकेट चालवत असून तिच्याकडे चौकशी करत असताना तुमचा व्हिडिओ आम्हाला मिळालेला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात येणार होता मात्र तो जर अपलोड होऊ नये अशी तुमची इच्छा असेल तर मी दुसरा नंबर देतो त्याच्यावर फोन करा असे सांगितले आणि फोन केल्यानंतर त्यांच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आली.
तक्रारदार व्यक्ती यांनी बदनामीच्या भीतीने अखेर पन्नास हजार रुपये दिले मात्र तरी देखील सातत्याने या व्यक्तीकडे पैशाची मागणी होत होती. 18 मार्चपासून तर 25 मार्च या अवघ्या आठवड्याभरात त्यांच्याकडून तब्बल सहा लाख 50 हजार रुपये उकळण्यात आले तरीदेखील त्यांच्या पाठीमागे असलेला हा ससेमिरा कमी होत नसल्याने अखेर त्यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिलेल्या असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे.