नामांकित चित्रपट वितरकाला ‘ फ्री ‘ मोबाईल पडला लई भारी

मुंबई म्हणजे मायानगरीच मात्र अशाच एका चित्रपट वितरकाला नवीन मोबाईल देऊन त्यात बँकेचा तपशील भरत तब्बल दोन लाख 90 हजार रुपये खात्यातून लंपास करण्यात आल्याची घटना घडलेली आहे. जुहू पोलिस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

कपूर फिल्मचे चित्रपट वितरक असलेले मनमोहन कपूर ( वय 53 ) यांना हा गंडा घालण्यात आलेला आहे. फसवणूक करणाऱ्याने 27 मार्च रोजी प्रथम कपूर यांना फोन केला आणि तो बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगत कोणतेही शुल्क न आकारता आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्ड तुम्हाला देऊ असे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने पुन्हा कपूर यांच्याकडे पाठपुरावा करत त्यांना एक फॉर्म डाऊनलोड करायला सांगितला आणि त्यात तपशील भरण्यास सांगितले. कपूर यांनी तपशील भरला मात्र फसवणूक करणाऱ्याला पैसे काढण्यासाठी त्यांचा मोबाईलवरती रिमोट ऍक्सेस मिळू शकला नाही.

मनमोहन कपूर यांना मोबाईल फसवणूक करणाऱ्याने त्यांना चक्क एक मोफत मोबाईल भेट म्हणून पाठवत असल्याचे सांगितले आणि त्या फोनमध्ये त्याने एक सॉफ्टवेअर बसवले जेणेकरून त्याला कपूर यांच्या अकाउंटचा पूर्णपणे ॲक्सिस मिळाला त्यात त्याने कपूर यांच्याकडून आधार कार्ड पॅन कार्ड आणि इतर बँकांचा देखील तपशील जाणून घेतला.

फसवणूक करणाऱ्यांनी बँकेचे सध्याचे कार्ड हे आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्ड सोबत लिंक करावे लागेल जेणेकरून नवीन कार्ड आपले सक्रिय केले जाईल असे सांगत तब्बल दोन लाख 90 हजार रुपये खात्यातून लंपास केले आणि कपूर यांनी त्यानंतर पोलिस ठाण्यात दाखल होत त्या संदर्भात तक्रार दिली .