‘ देवमन ‘ चा पायगुण शेतकऱ्यासाठी धार्जीन , मृत्यूनंतर केले असे की..

शेअर करा

मुक्या प्राण्यावर दया करा असा संदेश प्रत्येक धर्मात दिला जातो मात्र क्वचितच काही नागरिक याचे पालन करतात. शेतकरी बांधव मात्र मोठ्या प्रमाणात त्यांच्या जनावरांवर प्रेम करतात अशी एक घटना नगर जिल्ह्यात समोर आली असून श्रीगोंदा येथील एका शेतकऱ्याने चक्क बैलाचा दशक्रिया विधी पार पडलेला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील भावडी येथील रहिवासी असलेले नवनाथ भोसले यांच्या बैलजोडीतील ‘ देवमन ‘ नावाचा बैल याचा मृत्यू झालेला होता. नवनाथ भोसले यांच्याकडे असलेल्या गाईला एक गोऱ्हा झाला त्यावेळी त्यांनी त्याचे नाव देवमन ठेवलेले होते. देवमनचा जन्म झाला आणि त्यानंतर या कुटुंबाची चांगलीच आर्थिक भरभराट झाली. देवमनचा पायगुण आपल्या कुटुंबासाठी खूप चांगला आहे अशी या शेतकऱ्याची धारणा झाली होती.

आपल्या शेतीसाठी नवनाथ भोसले यांनी देवमनच्या जोडीला त्या नावाचा पोपट्या नावाचा आणखी एक बैल आणला आणि त्यातून शेतीत मोठ्या प्रमाणात कष्ट करत आपला संसार फुलवला. त्यांच्या या बैलजोडीने त्यांच्या या संघर्षात महत्त्वाची भूमिका बजावली. नवनाथ यांनी आपल्या मुलाला उच्च शिक्षण देत अधिकारी बनवले आणि मुलींचा देखील विवाह चांगल्या ठिकाणी करून दिला.

देवमन याचा आपल्या मालकावर इतका जीव होता की मालक घरी येईपर्यंत देवमन हा उभा राहून त्यांची वाट पाहायचा. गेल्या तीन-चार वर्षांपासून मालकांनी त्याला कुठल्याही स्वरूपाचे काम करून दिले नाही. दारात असलेला देवमन हीच माझी संपत्ती आहे अशी त्यांची धारणा झाली होती. वृद्ध माणसाप्रमाणे देवमनचा भोसले कुटुंबियांनी सांभाळ केला त्यानंतर अचानकपणे त्याचा मृत्यू झाला आणि कुटुंबावर दुःखाचा पहाड कोसळला. 11 सप्टेंबर रोजी यांनी आपल्या निवासस्थानी जिथे या बैलाचे अंत्यसंस्कार केले तिथेच त्याचा दशक्रिया विधी देखील पार पाडला. या अनोख्या दशक्रिया विधीसाठी परिसरातील अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तर घरातील कुटुंबियांना देखील यावेळी अश्रू अनावर झाले होते .


शेअर करा