छत्रपती शिवाजी महाराजांनी एक गोष्ट शिकवली ती म्हणजे .., शरद पवार म्हणाले की..

शेअर करा

छत्रपती शिवाजी महाराज हे आपले प्रेरणास्थान असून त्यांनी आपणास एक गोष्ट शिकवली आहे ती म्हणजे दिल्लीच्या तख्तासमोर समोर कधीही न झुकण्याची, अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारला आव्हान दिले आहे. केंद्र सरकार ईडी सीबीआय यासारख्या संस्थांचा वापर करत दुरुपयोग करत आहे असेही पवार यांनी सांगत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

शरद पवार नवी दिल्ली येथे बोलताना म्हणाले की, ‘ छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आपल्याला प्रेरणा मिळते. शिवाजी महाराजांनी एक गोष्ट शिकवली आहे ती म्हणजे दिल्लीच्या तख्तासमोर कधी न झुकण्याची. याच ऐतिहासिक मैदानावरून १७३७ साली बाजीराव पेशवे यांनी दिल्लीच्या बादशहाला आव्हान दिले होते. देशात महागाईचा कळस गाठलेला असताना भाजपचे नेते देश पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाल्याचा दावा करतात मात्र भारताचे दरडोई उत्पन्न ब्रिटनच्या तुलनेत फार कमी आहे.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असला तरी देशाने अनेक संकटे आणि राजकीय चढ-उतार पाहिले आहेत. श्रीलंका आणि पाकिस्तान येथील हुकुमशाही पाहिलेली आहे. त्याचा परिणाम तिथल्या सरकार आणि संसदीय लोकशाहीवर झाला. काही मोजक्या लोकांच्या हातात सत्ता असल्याचे आपण पाहत असून देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर कृषी आधारित आहे. आपल्याला सर्वांना शेतकऱ्यांबद्दल अभिमान आहे मात्र दुर्दैवाने देशाला शेतकऱ्यांच्या आत्महत्या पहाव्या लागत आहेत.

गेल्यावर्षी केंद्राच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले सुरुवातीला सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले मात्र अखेर मोदी सरकारला शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरीवर्ग आणि कृषी क्षेत्राच्या हितासाठी जपणारा पक्ष असून शेतकऱ्यांसाठी वारंवार लढण्यासाठी आपल्याला तयार राहावे लागेल असेदेखील त्यांनी पुढे ठणकावले.


शेअर करा