औरंगाबादमधील अपहरणकांड अखेर संपुष्टात , एमआयडीसीचा निवृत्त अधिकारी हेरला अन..

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना औरंगाबाद जिल्ह्यात समोर आलेली असून छत्रपती संभाजी साखर कारखान्याजवळ इब्राहिमपूर शिवारात सुमारे तीन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी एमआयडीसीच्या निवृत्त अधिकार्‍याचे अपहरण करण्यात आले होते. विश्वनाथ राजळे असे या अधिकार्‍याचे नाव असून शनिवारी दुपारी हा प्रकार समोर आला होता. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी रात्री साडेनऊच्या सुमारास जालना जिल्ह्यातील बदनापुर येथून या अधिकाऱ्यांची सुटका केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर घटनेमागे मास्टरमाईंड असलेला व्यक्ती हा या अधिकाऱ्याचा सालगडी असून त्याच्यासोबत त्याचा मुलगा देखील या प्रकरणात सहभागी होता. पोलिसांनी इतरही सात जणांना ताब्यात घेतले आहे आणि विश्वनाथ लक्ष्मण राजळे ( राहणार सिडको औरंगाबाद ) यांची सुटका केलेली आहे.

आरोपी दीपक भाऊराव भागवत ( वय 40 ) आणि त्याचा मुलगा रोहित दीपक भागवत ( वय 19 राहणार वडाची वाडी तालुका औरंगाबाद ) अशी मुख्य आरोपींची नावे असून इब्राहिमपूर शिवारातून शनिवारी दुपारी राजळे यांना चाकूचा धाक दाखवून सात ते आठ जणांनी गाडीत बसून पळून नेले होते त्यानंतर त्यांनी राजळे यांच्या मुलाकडे तीन कोटी 80 लाख रुपयांची खंडणी मागितली. पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत गुप्तपणे पोलिसांनी मोहीम राबवली आणि त्यानंतर मुख्य आरोपींना अटक करण्यात आली . राजळे हे एमआयडीसी येथे मोठ्या पदावर कार्यरत होते त्यामुळे त्यांच्याकडे खूप पैसा आहे असा आरोपींचा समज होता त्यातून त्यांनी हा कट रचला होता.

सदर प्रकरण पोलिसात आल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मोबाईल लोकेशनचे तांत्रिक विश्लेषण करत त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री नऊ वाजल्यानंतर दावरवाडी शिवारातील एका पेट्रोल पंपावर आरोपी असल्याचे समजताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि त्यांना बेड्या ठोकल्या. राजळे यांच्या जीविताला धोका होण्याची देखील शक्यता होती त्यामुळे पोलिसांनी अत्यंत गोपनीयता बाळगत आरोपींना त्यांच्या पाठीमागे आम्ही आहोत याचा शोध लागू दिला नाही आणि विक्रमी वेळेत कारवाई करून राजळे यांची सुखरूप सुटका केली. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.