तळीराम चक्क मोबाईल टॉवरवर ‘ बसले ‘ , खाली उतरताच येईना म्हणून..

राज्यात एक वेगळेच प्रकरण सध्या चर्चेत आलेले असून तळीराम व्यक्तींनी ‘ बसण्यासाठी ‘ म्हणून चक्क मोबाईल टॉवरची निवड केल्याचे हे प्रकरण आहे. अनेकदा परमिटरूम असलेल्या ठिकाणी गेल्यावर जास्त दर आकारला जातो म्हणून काही व्यक्ती दारूच्या दुकानातुन दारू विकत घेऊन निवांत असलेल्या एखाद्या ठिकाणी जाऊन मद्यप्राशन करतात मात्र या महाभागांनी मोबाईल टॉवरची निवड केली आणि मोबाईल टॉवरवर जाऊन दारू पिण्यास सुरू केले.

यवतमाळ येथील हे प्रकरण असून भोसा इथे दोन दारूडे दारू पिण्याच्या उद्देशाने बाटली घेऊन टॉवरवर चढले आणि मोबाईल टॉवरच्या अँगलवर बसून त्यांनी यथेच्छ दारू पिली. दारूचा अंमल शरीरावर सुरू झाल्यानंतर आता मोबाईल टावरवरून खाली उतरणे आपल्याला शक्य होणार नाही हे त्यांच्या लक्षात आले आणि जर आपण पडलो तर आपला जीव जाईल या भीतीने त्यांनी आरडाओरडा सुरू केला. परिसरातील नागरिकांनी या प्रकाराची माहिती अग्निशामक विभागाला दिली आणि अवघ्या काही मिनिटात अग्निशामक दल तिथे पोहोचले. त्यानंतर त्यांनी कसरत करून तळीरामांना खाली उतरवण्यात आले. अग्निशामक दलाकडून त्यांची चांगलीच कानउघडणी करण्यात आली. रविवारी सकाळी ही घटना घडलेली आहे.

निकेत गाढवे आणि राकेश चव्हाण अशी या तळीरामांची नावे असून मोबाईल टॉवरवर ते दारू पिण्यासाठी बसले होते. थोडी थोडी करत त्यांनी भरपूर दारू प्राशन केली मात्र त्यानंतर त्यांना चांगलीच दारू चढली आणि टॉवरवरून उतरता येईना. आता उतरायला गेलो तर आपण पडू या भीतीने त्यांनी वरून मोठ्या प्रमाणात आरडाओरडा सुरू केला म्हणून परिसरातील नागरिक गोळा झाले. कुटुंबीय देखील तिथे आले आणि त्यांनी देखील त्यांची अवस्था पाहून रडारडी सुरू केली. अग्निशामक दलाने अवघ्या काही मिनिटात दाखल होत त्यांची सुटका केली असून अग्निशामक दलाच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल त्यांचे परिसरात कौतुक केले जात आहे .