
देशात एक खळबळजनक अशी घटना समोर आली असून पंजाबच्या अमृतसर शहरात अज्ञात हल्लेखोराने शिवसेनेचे स्थानिक नेते सुधीर सुरी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. सुधीर सुरी हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते त्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्दैवाने त्यांचे निधन झालेले आहे. पंजाबमधील कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप विरोधकांनी केला असून काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेसह इतरही स्थानिक पक्षांनी आम आदमी पार्टी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतसर शहरातील सर्वाधिक गजबजलेला परिसर म्हणून मजीठा रोडची ओळख आहे. या रोडवर असलेल्या गोपाळ मंदिरासमोर शिवसेनेचे नेते सुधीर सूरी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. परिसरातील एका ठिकाणी कचऱ्यामध्ये मूर्ती आढळून आल्यानंतर या मंदिराच्या बाहेर सुधीर सुरी हे निदर्शने करत होते त्यावेळी गर्दीतून आलेल्या एकाने त्यांच्यावर गोळीबार केला.
अज्ञात आरोपीने केलेल्या गोळीबारात सुधीर सुरी हे गंभीररीत्या जखमी झाले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुधीर सूरी यांना धमक्या येत होत्या त्यानंतर सरकारने त्यांना आठ जवानांचे सुरक्षा कवच देखील दिले होते मात्र तरीही अज्ञात व्यक्तीने त्यांची हत्या केली.