फुकट सरपंच झाली म्हणत महिलेला घरात घुसून मारहाण

ग्रामपंचायत निवडणूक झाली त्यानंतर विजयी उमेदवारांच्या मिरवणुका देखील काढण्यात आल्या मात्र विरोधी व्यक्तींना आपण निवडणूक हरल्याची रुखरुख लागून राहिली आणि त्यानंतर विजयी झालेल्या उमेदवारावर देखील हल्ला झाल्याचा प्रकार बुलढाणा जिल्ह्यात समोर आलेला आहे. मेहकर तालुक्यातील सारशिव गावात एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे सदर महिलेला घरात घुसून चौदा ते पंधरा जणांच्या समूहाने मारहाण केली. ही महिला सरपंच म्हणून निवडून आली होती त्यावेळी तिला तू फुकट सरपंच झाली आहेस असे म्हणत महिलेच्या मुलांना देखील मारहाण करण्यात आली. पीडित महिला असलेल्या रमाबाई जाधव यांनी जानेफळ पोलीस स्टेशन गाठले मात्र नेहमीप्रमाणे पोलिसांनी त्यांची तक्रारही दाखल करून घेतली नाही.

रमाबाई जाधव या बराच काळ जानेफळ पोलीस स्टेशन येथे ताटकळत बसलेल्या होत्या मात्र गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत म्हणून त्यांनी अखेर पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून तक्रार घेऊन त्या पुन्हा जानेफळ पोलीस स्टेशन येथे पोहोचल्या मात्र अद्यापही पोलिसांनी आरोपींच्या विरोधात कुठलीही कारवाई केली नसल्याचा त्यांचा आरोप असून त्यांच्या या मारहाणीत आपला हात फॅक्चर झालेला आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा या घटनेनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून असे प्रकार पोलीस गांभीर्याने का घेत नाहीत ? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनता विचारत आहे. एक तर गुन्हे दाखल करून घ्यायचे नाही जेणेकरून आपल्याला तपासाचा लोड नको तसेच पोलिस स्टेशनचे नाव देखील खराब होते म्हणून तक्रारी दाखल न करून घेण्याचा नवीन पायंडा महाराष्ट्रात पडतो आहे. महत्प्रयासाने तक्रार दाखल केली तर जुजबी कलमे लावायची जेणेकरून गुन्हेगार पुन्हा मोकाट सुटतात आणि नवीन गुन्हे करण्यास उद्युक्त होतात असेल दिसून येत आहे.